शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून तिथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा खळबळजनक आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
ते म्हणाले की, मोदी-शहा या जोडगोळीने कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर व काँग्रेस आघाडीचे सरकार पेगॅससद्वारे हेरगिरी करून पाडले. त्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार या दोघांनी उलथवून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. आता या दोघांची नजर महाराष्ट्रावर आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नेत्यांवर पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे का, याची मला कल्पना नाही. मोदी व शहा पेगॅससची मदत आता घेतात का, हेही मला माहीत नाही. मात्र कर्नाटक, मध्य प्रदेशात जे घडले, तो महाराष्ट्रासाठी इशारा आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप नेते व घटनात्मक पदांवर विराजमान असलेल्या लोकांच्या सध्याच्या हालचाली पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्यांचे इरादे चांगले नाहीत.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट
आमच्या "एकला चलो रे" या नाऱ्याकडे गांभीर्याने बघू नका. पंधरा वर्षे महाराष्ट्रात आपण दोघे सत्तेत असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळे लढलो. मंत्रिमंडळ बैठकीत आपण एकत्र निर्णय घ्यायचो आणि स्थानिक निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करायचो. आताही तेच करायचे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजावू. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या भेटीत असा संवाद झाला की काय? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
मोदी-अजित डोवाल यांचे इस्रायल दौरे कशासाठी?
२०१८-२०१९ या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यावरून वादंग निर्माण झाले होते. याच दौऱ्यादरम्यान एनएसओ या कंपनीशी पेगॅसस तंत्रज्ञान विकत घेण्याबाबत बोलणी झाली असावी, असाही आरोप होत आहे. मोदी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही काही वेळा इस्रायलला भेट दिली होती. डोवाल यांचे दौरे पेगॅससच्या मुद्द्याशी निगडित होते का, असाही सवाल विरोधकांनी विचारला आहे.