नवी दिल्ली - देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात खंबीर नेते म्हणून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी सर्वार्थाने पात्र आहेत, असे प्रशंसोद्गार काढताना खरगे यांना माझे आणि पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याची ग्वाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे दिली.
निवडणुकीच्या राजकारणात ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांच्यावरील ‘मल्लिकार्जुन खरगे - पॉलिटिकल एंगेजमेंट विथ कम्पॅशन, जस्टिस अँड इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सोनिया गांधी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, राजदचे खासदार मनोज झा, द्रमुकचे ज्येष्ठ नेते टी. आर. बालू तसेच पुस्तकाचे संपादक सुखदेव थोरात आणि चेतन शिंदे उपस्थित होते. जवाहर भवन येथील सोहळ्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत, भूपेश बघेल आणि सुखविंदर सुक्खू उपस्थित होते. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, वर्षा गायकवाड, खा. कुमार केतकर, प्रा. भालचंद्र मुणगेकर आदी ज्येष्ठ नेते आले होते. खरगे यांच्या पत्नी राधाबाई खरगे, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी तसेच इंडिया आघाडीतील नेते उपस्थित होते.
सोनिया गांधींनी केली मुक्तकंठाने प्रशंसाअतिशय महत्त्वाच्या घडीला खरगे यांच्या हाती काँग्रेस पक्षाची सूत्रे आहेत. राजकारणात ५० वर्षे हा प्रदीर्घ कालखंड ठरतो. राजकारणातील अनिश्चिततेच्या वाटचालीत खरगे केवळ टिकूनच राहिले नाहीत, तर त्यांच्या कारकिर्दीची कमान सतत चढती राहिली. त्यांनी आपल्या आदर्शवादाशी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळेच काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची प्रतिमा उत्तुंग ठरली आहे. व्यक्तिशः आपल्यासाठी खरगे हे एक विवेकी सहकारी आहेत. त्यांनी माझ्यावरची अनेक ओझी खंबीरपणे सांभाळली, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
मतभेद विसरून एकजूट होणे महत्त्वाचे : खरगेगेल्या पन्नास वर्षांत देश अनेक आव्हानांना सामोरा जाताना आपण पाहिले आहे. त्यावर मात करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून आम्हाला एकजूट होण्याचे धाडस दाखवावे लागेल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. सोनिया गांधी यांच्यापासून ज्यांच्याशी राजकीय आणि आदर्शवादावरून मतभेद आहेत, अशा नेत्यांनीही या पुस्तकासाठी हातभार लावल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
विश्वासार्हता आणि सचोटीचे प्रतीक : येचुरीबालपणी आपल्या आई-बहिणीसह रझाकारांच्या दंगलीत घर जळालेल्या खरगेंच्या मनात द्वेषाचा लवलेश नाही. राजकारणासाठीची सचोटी आणि विश्वासार्हता खरगे यांच्यापाशी आहे, असे सीताराम येचुरी म्हणाले. खरगे हे ‘इंडिया’तील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी त्याचे नेतृत्व करावे, असे टी. आर. बालू म्हणाले. खरगे हे आंबेडकर आणि नेहरू यांच्यातील दुवा बनण्याचे काम करीत आहेत, असे मनोज झा म्हणाले.