Mallikarjun Kharge on BJP : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गुरुवारी राज्यसभेतून भाजप खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला. हे भाजपचे लोक जे आरोप करत आहेत, ते त्यांनी सिद्ध करावे. आरोप सिद्ध झाले, तर मी राजीनामा देईन. तुमच्यापुढे मी मोडोन, पण कधीच झुकणार नाही, असेही खर्गेंनी यावेळी ठणकावून सांगितले. (Waqf Bill 2025)
अनुराग ठाकूर यांनी काय आरोप केला?बुधवारी लोकसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान अनुराग ठाकूर म्हणाले होते की, भारताने वक्फच्या भीतीपासून मुक्त होण्याची गरज आहे. काँग्रेस राजवटीत बनवलेल्या वक्फ कायद्याचा अर्थ 'वक्फ जे म्हणेल ते बरोबर आहे' असा होतो. वक्फ बोर्डाचा उद्देश मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी मालमत्तेचे व्यवस्थापन करणे हा होता, परंतु काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राजकीय आश्रय देऊन त्यांना व्होट बँक बनवले.
कर्नाटक विधानसभेच्या अहवालात वक्फ मालमत्तेची फेरफार करुन घोटाळे करणाऱ्या एका नव्हे, तर अनेक काँग्रेस नेत्यांची नावे समोर आली आहेत. म्हणूनच तुम्हाला पारदर्शकता नको आहे आणि जबाबदारीही नको आहे. कर्नाटकात झालेल्या वक्फ घोटाळ्यात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही हात आहे. कधी जातीच्या नावावर, तर कधी धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम काँग्रेस करते, असा आरोप ठाकूर यांनी केला होता.
खर्गेंचा पलटवारअनुराग ठाकेर यांच्या आरोपानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पलटवार केला. खर्गे म्हणाले, माझ्याकडे एक इंचही वक्फ जमीन असेल तर सिद्ध करा. घाबरवून भाजपवाल्यांना मला झुकवायचे असेल, तर मी तुटेल पण कधीच झुकणार नाही. माझ्याकडे एक इंचही वक्फ जमीन असेल, तर मी राजीनामा देईन. पण, माझ्याकडे काहीच सापडले नाही, तर हा आरोप केल्याबद्दल सभागृहनेत्यांनी माफी मागावी, अनुराग ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.