Mallikarjun Kharge on Parliament Session : संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल(दि.1 जुलै) जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारवर टोकाची टीका केली. पण, त्यांच्या भाषणातील काही भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला. असेच काहीसे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या भाषणाबाबत घडले. यावरुन खर्गेंनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.
मीडियाशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांना भाषणातील काही भाग काढून टाकण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, "या सरकारला सत्य सहन होत नाही. आमच्या भाषणाचे कितीही भाग काढला तरी, सत्य हेच सत्य राहील. आम्ही सत्य बोललो तरी ते काढून टाकले जाते आणि त्यांची खोटी आश्वासने दाखवली जातात. मी या गोष्टीची निंदा करतो. जे खरं आहे, ते दाखवा आणि जे चूक आहे, त्याला काढून टाका. पण, सरकारला जे नकोय, ते त्याचा विरोध करतात," अशी टीका त्यांनी यावेळी केली.
राहुलच्या विधानावर काय म्हणाले?मल्लिकार्जुन खर्गे यांना यावेळी राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावर केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, "हे सर्व खोटं आहे. राहुल गांधी म्हणाले की, फक्त तुम्ही (भाजप) हिंदू नाही, तर देशातील सर्व लोक हिंदू आहेत. तुम्ही हिंदू आणि हिंदुत्वाचा जो अर्थ लावत आहात, तो चुकीचे आहे. हिंदू एक मोठा धर्म आहे आणि एक धर्म म्हणून त्यात सहिष्णुता आहे. पण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने हिंदू धर्माचा अर्थ लावत आहात, ते चुकीचे आहे."