Mallikarjun Kharge Piyush Goyal verbal fight, Congress vs BJP: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प लोकाभिमुख घोषणा टाळून पुढील आर्थिक वर्षासाठी सुधारणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्च ११ टक्क्यांनी वाढवून ११.११ लाख कोटी रुपये केला. आयात शुल्कासह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ आयकर आघाडीवर स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही. परंपरेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनीी अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. मात्र त्यानंतर आज सुरु झालेल्या राज्यसभेच्या कार्यवाही दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या शाब्दिक द्वंद्व पाहायला मिळाले.
काँग्रेस नेत्यांसाठी हे लज्जास्पद
झारखंडचे मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरील धाडसत्र आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडींवरून राज्यसभेत दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, बिहारमध्ये नितीश सकाळी इकडचा राजीनामा देतात, आणि संध्याकाळी तिकडे (भाजपमध्ये) सामील होऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात. पण झारखंडमध्ये अद्याप मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते पियूष गोयल म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या आरोपींच्या समर्थनार्थ काँग्रेसने आवाज उठवणे आणि आमच्यावर आरोप करणे लज्जास्पद आहे. पण भ्रष्टाचार हा काँग्रेसच्याच डीएनएमध्येच आहे.
मल्लिकार्जुन खर्गेंचा 'शब्द'
त्याच सत्रात या दोघांमध्ये देशप्रेमावरुनही वाक्-युद्ध पाहायला मिळाले. राज्यसभेत पियूष गोयल यांनी काँग्रेस देश तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यादरम्यान सभागृहात गदारोळ झाला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे, काँग्रेस कधीही देश तोडण्याचे बोलू शकत नाही. मी, मल्लिकार्जुन खर्गे तुम्हाला शब्द देतो की, जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर काँग्रेस त्याला विरोध करेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो.
त्याआधी आज संसदेची कार्यवाही सुरु होताच लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला. भाजप खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानंतर काही काळाने कामकाज सुरळीतपणे सुरु झाले.