- हरीश गुप्ता नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी राज्यसभेत मात्र काँग्रेसला मोठ्या मुश्किलीने विरोधी पक्षनेतेपद टिकविता आले आहे. नियमानुसार राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला २५ जागांची आवश्यकता असते. म्हणजे, एकूण २४५ सदस्यांपैकी १० टक्के. हे पद काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आहे.
के. सी. वेणुगोपाल (केरळ) आणि दीपेंद्र सिंह हुड्डा (हरयाणा) लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काँग्रेसचे संख्याबळ २६ पर्यंत खाली आले आहे. हरयाणा आणि केरळमध्ये काँग्रेसकडे बहुमत नसल्याने पोटनिवडणुकीत या दोन राज्यसभेच्या जागा पक्षाला जिंकता येणार नाहीत. इतर राज्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. तसेच आसाम, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा आणि त्रिपुरा या राज्यांमधून अनेक राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून आले आहेत. केरळमध्ये राज्यसभेच्या इतर दोन जागांसाठीही मतदान होणार आहे. या राज्यांमध्ये काँग्रेस एकही जागा जिंकण्याच्या स्थितीत नाही. या राज्यांमधील सात खासदार भाजपचे आहेत. काँग्रेसचे दोन आणि राजदचा एक खासदार आहे. भाजपला हरयाणा आणि बिहारमध्येही जागा मिळण्याची शक्यता आहे तर केरळमध्ये डाव्या पक्षांना अतिरिक्त जागा मिळतील.
नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीसाठी १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून रोजी सुरू होईल, असे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी येथे सांगितले. ५४२ खासदारांच्या शपथविधीनंतर लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशनाचा समारोप ३ जुलै रोजी होईल.