नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले. मात्र, नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस नाराज असल्याचे दिसून येत आहे.
कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांनी भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ' सरकारने शिवकुमार स्वामी यांचे काम पाहिले होते. यानंतरही त्यांना भाजपा सरकारने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला नाही. हे खेदजनक आहे', असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
'प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न दिला जाणार आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र, शिवकुमार स्वामी यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यामुळे शिवकुमार स्वामी यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे होता, असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवकुमार स्वामी यांचे निधन झाले. ते 111 वर्षांचे होते.