नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः पक्षप्रमुख होण्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. याचबरोबर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे म्हटले आहे. महिला काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत फक्त स्वतःबद्दल बोलतात. त्यांना गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर आठवत नाहीत. मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान तिकडे गेले नाहीत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. तसेच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर सांगितले की, पुढच्यावेळी ते पुन्हा येथे ध्वजारोहण करतील. मी म्हणालो, ते झेंडा नक्कीच फडकावतील पण आपल्या घरी आणि अमित शहा आपल्या घरी पत्नीसह आपल्या घरी फडकवतील.
याचबरोबर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, राहुल गांधी भारताला जोडण्याचे काम करतात तर पंतप्रधान ते तोडण्याचे काम करतात. पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. महिलांनी निर्धार केला तर त्या भाजप सरकारला हटवू शकतात. तसेच, बांगलादेश युद्धाचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र केला, पाकिस्तानच्या एक लाख लोकांना तुरुंगात टाकले. तर आकाशात उडणाऱ्या गरुडाला म्हैस म्हणत मोदींनी दिशाभूल केली. याशिवाय, विरोधी पक्षांच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून टार्गेट केले जात आहे. मात्र, काँग्रेस घाबरत नाही, असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.