काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात सोमवारी पक्षाध्यक्षपदासाठी लढत होईल. काँग्रेसच्या अध्यक्षपदी २४ वर्षांनंतर प्रथमच नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती विराजमान होणार आहे. प्रदेश काँग्रेस समित्यांचे (पीसीसी) नऊ हजारांहून अधिक प्रतिनिधी गुप्त मतदानाद्वारे पक्षाचा नया अध्यक्ष निवडतील. येथील पक्ष मुख्यालयात व देशभरातील ६५ हून अधिक केंद्रांवर मतदान होईल. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची ही सहाची वेळ आहे.
राहुल गांधी कर्नाटकमध्ये करणार मतदानकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी येथील पक्ष मुख्यालयात मतदान करू शकतात. राहुल गांधी कर्नाटकातील सगनाकल्लू (बेल्लारी) येथे भारत जोडो यात्रा शिबिराच्या ठिकाणी मतदानात भाग घेतील. त्याच्यासोबत यात्रेत सहभागी असलेले पीसीसीचे जवळपास ४० प्रतिनिधीही तेथे मतदान करतील.
२००० साली काँग्रेस अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक झाली होती. तेव्हा जितेंद्र प्रसाद यांचा सोनिया गांधींनी पराभव केला होता. यावेळी सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपद निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.प्रबळ दावेदार कोण?
- गांधी घराण्याशी असलेली जवळीक आणि अनेक वरिष्ठ नेत्यांच्या पाठिंब्यामुळे खरगे यांना अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तथापि थरूर हेदेखील सुधारणावादी उमेदवार म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करत आहेत.
- थरूर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान संधीतील भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला होता; पण खरगे व पक्षासोबतच त्यांनीही हे मान्य केले आहे की गांधी कुटुंबातील सदस्य तटस्थ आहेत आणि कोणीही अधिकृत उमेदवार नाही.