अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:07 PM2019-05-24T17:07:02+5:302019-05-24T17:07:39+5:30
मल्लिकार्जुन खरगे म्हणजे विजय निश्चित असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये असायचा. खरगेंनी जिथून निवडणूक लढवली तेथे त्याचा विजय झाला हेच समीकरण होते. परंतु, २०१९ मधील मोदी लाटेत खरगेंना देखील धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत एनडीएला लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. जनतेने मतपेटीतून स्पष्ट केले की, मोदींना हटविणे सोपं नाहीच. अनेक राज्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सामील झाले आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणजे विजय निश्चित असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये असायचा. खरगेंनी जिथून निवडणूक लढवली तेथे त्याचा विजय झाला हेच समीकरण होते. परंतु, २०१९ मधील मोदी लाटेत खरगेंना देखील धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. राजकीय कारकिर्दीत खरगेंना पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले.
खरगे आपल्या कारकिर्दीत ९ वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झाले. लोकसभेत काँग्रेसचे नेते असलेले खरगे यांना गुलबर्ग तर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांना तूमकूर मतदार संघातून पराभवाला सामोरे जावे लागले. भाजप उमेदवार उमेश जाधव यांनी खरगेंना पराभूत केले. जाधव यांनी ९५ हजार ४५२ मतांचे मताधिक्य घेतले. खरगे यांनी केंद्रात मंत्रीपद सांभाळले आहे. २०१४ मध्ये याच मतदार संघातून खरगे विजयी झाले होते. कर्नाटकच्या राजकारणात खरगे यांना दलित नेते म्हणून पाहिले जाते. यावेळी मात्र कर्नाटकमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. भाजपने कर्नाटकमधील २८ पैकी २५ जागांवर विजय मिळवला.