नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताच शशी थरूर यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. खर्गे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या जागी दुसऱ्या समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये ४७ सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, ए. के. अँटोनी यांचा समावेश आहे. मात्र काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या शशी थरूर यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
काँग्रेसमध्ये प्रत्येक मोठा निर्णय हा काँग्रेस वर्किंग कमिटीकडून घेतला जात असतो. त्या समितीमध्ये एकूण २३ सदस्य असायचे. मात्र खर्गे यांनी ही समितीच संपुष्टात आणली आहे. त्याऐवजी जी नवी समिती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये ४७ सदस्यांना स्थान देण्यात आले आहे. आता ही समिती अनेक मोठे निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची घटना विचारात घेऊन ही नवी समिती स्थापन केली आहे. काँग्रेसकडून एक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे की, कलम XV (b) अन्वये स्टीरिंग कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. ती आता काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) च्या जागी काम करेल.
खर्गे यांनी आपल्या समितीमध्ये अनेक मोठ्या चेहऱ्यांना स्थान दिले आहे. या यादीमध्ये अभिषेक मनू सिंघवी, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाला, अजय माकन, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, हरिष रावत, जयराम रमेश, के.सी. वेणुगोपाल, मीरा कुमार, पी.एल. पुनिया, प्रमोद तिवारी, सलमान खुर्शिद, राजीव शुक्ला यांना स्थान देण्यात आले आहे.