PM Modi Reply: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अरुणाचलच्या तवांगमध्ये भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेस संसदेत चांगलीच आक्रमक झाली असून, गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत.
खर्गे म्हणाले होते की, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी जीव दिला, तुम्ही काय केले? तुमच्या घरातील कुत्रा तरी देशासाठी मेला आहे का? याशिवाय, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पीएम मोदींनी संसदेत कुत्र्याच्या वक्तव्यावर खर्गे यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले.
7 फेब्रुवारी 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले होते की, “इतिहास हा केवळ पुस्तकात राहिला तर समाज जीवनाला प्रेरणा देत नाही. प्रत्येक युगात इतिहास जाणून घेण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यावेळी आम्ही होतो की नव्हतो माहित नाही. आमचे कुत्रे होते किंवा नव्हते माहित नाही. इतरांचे कुत्रे असू शकतात. आम्ही कुत्र्यांच्या परंपरेत वाढलेलो नाही. पण काँग्रेस पक्षाचा जन्मही झाला नव्हता तेव्हा देशात करोडो लोक होते. 1857 चा स्वातंत्र्यलढा या देशातील जनतेने जीव धोक्यात घालून लढला. त्याकाळी पंथाचा भेदभाव नव्हता. तेव्हाही कमळ होते आणि आजही कमळ आहे.
या दोन्ही विधानांचा मेळ घालणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुन्हा तेच विधान केले, जे त्यांनी पाच वर्षांपूर्वी संसदेत दिले होते. त्यानंतर पीएम मोदींनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी सांगितले की, भाजपबद्दल केलेल्या या वक्तव्याचा आम्ही काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचा तीव्र निषेध करतो. खर्गे हे काँग्रेसमध्ये केवळ रबर स्टॅम्पची भूमिका बजावत आहेत.