नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. १३७ वर्षांच्या इतिहासातील ही सहावी निवडणूक जिंकत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी खरगेंच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेतून फोन करून खरगे यांना शुभेच्छा दिल्या.
खरगे यांच्यावर देशभरातील कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. याचदरम्यान दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी मतमोजणीनंतर जाहीर केले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९,३८५ मतांपैकी खरगे यांना ७,८९७ आणि शशी थरूर यांना १०७२ मते मिळाली, तर ४१६ मते अवैध ठरविण्यात आली. खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याचे मिस्त्री यांनी येथे एआयसीसी मुख्यालयात पत्रकार परिषदेत बुधवारी जाहीर केले. खरगेंविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढत असलेले शशी थरूर यांना केवळ १० टक्के मते मिळाली.
दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि तेलंगणातील मतदानाशी संबंधित थरूर यांच्या टीमच्या तक्रारीवर बोलताना मिस्त्री म्हणाले की, आपण पत्राला प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देऊ. ते म्हणाले की, हे पत्र प्रेसमध्ये लीक व्हायला नको होते. थरूर यांच्या टीमने थेट निवडणूक प्राधिकरणाशी संपर्क साधायला हवा होता. ते म्हणाले की, पत्रातील मुद्द्याला काहीही आधार नाही. तक्रारीत तथ्य नाही. खरगे हे गेल्या २४ वर्षांतील पहिले गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष आहेत.