नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी भारताबाहेर पैसा वळता केल्याचे सकृतदर्शनी पुरावे उपलब्ध असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे.मल्ल्या यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला देण्यात आलेल्या कर्जासंबंधी सर्व दस्तऐवज आणि तपशील दोन दिवसांत सादर करावा असा आदेश ईडीने आयडीबीआयसह १७ बँकांना दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.किंगफिशर एअरलाईन्सने आयडीबीआयचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यातील (मनी लाँड्रिंग)तरतुदीनुसार या बँकेच्या सहा अधिकाऱ्यांना ईडीने यापूर्वीच समन्स बजावले होते. मल्ल्या यांनी ब्रिटनमधील ‘सण्डे गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेली मुलाखत रविवारी प्रसिद्ध झाली आहे. मी काहीही चूक केले नाही. मला बळीचा बकरा बनविले जात आहे, असेही त्यांनी म्हटले होते. मल्ल्या यांनी २ मार्च रोजी देश सोडला होता. कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे असे केले का? असे विचारण्यात आले असता त्यांनी मी माझ्या एका मित्रासोबत वैयक्तिक भेटीवर असल्याचे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मला गुन्हेगार का दाखविले जात आहे?कर्ज बुडणे हा व्यावसायिक भाग आहे. बँका कर्ज देतात तेव्हा त्यांना जोखीम माहीत असते. हा विचार बँकांनी केला आहे, आम्ही नाही, मग मला गुन्हेगार का दाखविले जात आहे. बँकांनी न्यायालयात धाव घेण्याआधीच मी देश का सोडला, हा अर्थ लावण्याचा भाग झाला, असेही ते म्हणाले.‘भारतात परतण्यासाठी ही योग्य वेळ नाही’‘‘भारतात आधीच माझ्यावर गुन्हेगार असल्याचा शिक्का मारण्यात आला आहे म्हणून माझ्यासाठी भारतात परतण्याची ही वेळ योग्य नाही’’, असे मद्य उत्पादक विजय मल्ल्या यांनी म्हटले. दोनच दिवसांपूर्वी मल्ल्या यांनी टिष्ट्वटरवर मी फरारी नाही व मी भारतातून पळून आलेलो नाही, असे म्हटले होते.मल्ल्या यांनी मी भारतात जाईन अशी आशा आहे, असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की, ईडीच्या नोटिशीनुसार ते उपस्थित राहण्याची शक्यता नाही किंवा भारतात लवकरच परततील, असेही नाही.
मल्ल्या यांनी पैसा बाहेर वळता केला
By admin | Published: March 15, 2016 3:16 AM