पिलिभीत : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा कथित ‘हमीदार’ असलेल्या मनमोहनसिंग या शेतकऱ्याने बँक आॅफ बडोदाच्या मुंबईस्थित कार्यालयाला स्थानिक शाखेला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.या बँकेने काही दिवसांपूर्वीच मनमोहनसिंग यांना मल्ल्या यांचे ‘हमीदार’ ठरवून त्यांची दोन खाती गोठविली होती. बँकेच्या या कारवाईने आपली बदनामी झाली असून, आपल्याला ३० दिवसांच्या आत १० लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे त्यांनी या नोटिशीत म्हटले आहे.मल्ल्या यांनी बँक आॅफ बडौदाकडून घेतलेल्या ५५० कोटी रुपयांच्या कर्जाचे हमीदार खजुरिया नविराम येथील मनमोहनसिंग हे शेतकरी असल्याचे गेल्या डिसेंबरमध्ये बँकेने ठरविले होते. त्यानंतर, बँकेने संबंधित शाखेला सिंग यांचे बचत आणि पीककर्ज गोठविण्यास सांगितले . आपण विजय मल्ल्या यांचे नाव कधीही ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या संचालक मंडळावर राहण्याचा आपला प्रश्नच नाही, असे मनमोहनसिंग यांनी बँक अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले. कागदपत्रेही सादर केली, पण बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही आणि त्यांच्या खात्यावर निर्बंध आणले होते.सिंग यांचे वकील रामपाल गंगवार म्हणाले की, ‘मनमोहनसिंग हे मल्ल्या यांचे ‘हमीदार’ आहेत, हे आपण कसे निश्चित केले, याचा खुलासा करण्यास आपण बँकेला सांगितले आहे.’ (वृत्तसंस्था)आर्थिक फटकाखाती गोठविण्यात आल्याने मनमोहनसिंग त्यांच्या पिकांची विक्री करू शकले नव्हते. चूक लक्षात आल्यानंतर बँकेने मनमोहनसिंग यांची खाती पुन्हा कार्यान्वित केली होती.
मल्ल्यांचा ‘हमीदार’ बँकेवर दावा ठोकणार
By admin | Published: June 12, 2016 3:44 AM