ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - परदेशात पळालेला उद्योगपती विजय माल्या याने लिहिलेल्या पत्रावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपाने आज पत्रकार परिषद घेत विजय माल्या याने मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांना लिहिलेली पत्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली आहेत.
सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय माल्याने मनमोहन सिंग यांची भेट घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मनमोहन सिंग यांनी केलेल्या सूचनेनुसार माल्या सिंग यांचे सल्लागार टी.के.ए. नायर यांना भेटल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.
माल्या यांनी मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांना प्रत्येकी दोन पत्रे लिहिल्याचे पात्रा यांनी सांगितले. तसेच त्यातील एका पत्रामधून किंगफिशर एअरलाइन्सला मदत केल्याने माल्याने मनमोहन सिंग यांचे आभार मानले होते, असेही पात्रा यांनी सांगितले.
काँग्रेसच्या कार्यकाळात तत्कालिन हवाई वाहतूक मंत्री वायलर रवी यांनी विमान कंपन्यांसाठी बेलआऊट पॅकेजची घोषणा केली होती. तसेच प्राप्तीकर विभागाने माल्यांची खाती गोठवल्यानंतर मनमोहन सिंग यांनी आदेश देत ही खाती पूर्ववत करण्यास सांगितल्याचाही आरोप आहे. मात्र आपल्याला माल्या यांनी पाठवलेले पत्र एक सामान्य पत्र होते आणि ठराविक प्रकियेनंतर ते संबंधित विभागांकडे पाठवण्यात आले. उद्योगपतींची अशी पत्रे येतच असतात, असे सांगत मनमोहन सिंग यांनी भाजपाने केलेला आरोप फेटाळून लावला आहे.