नवी दिल्ली : सार्वजनिक बँकांचे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले किंगफिशर एअरलाईन्सचे मालक आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट भारत सरकारने अखेर रद्द केला.‘मल्ल्या यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून त्यांचा पासपोर्ट दोन आठवड्यांसाठी निलंबित करण्यात आला होता. या नोटिशीला मल्या यांनी पाठविलेल्या उत्तरावर, सक्तवसुली संचालनालयाद्वारा (ईडी) सादर केलेल्या तथ्यावर आणि मुंबईच्या विशेष न्यायाधीशांनी पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटवर विचार केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने मल्यांचा पासपोर्ट रद्द केला आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी मंत्रालय कायदेतज्ज्ञांचाही सल्ला घेत आहे. मल्ल्या यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग आणि अन्य वित्तीय गैरप्रकार केल्याचे आरोप आहेत. याआधी ईडीच्या शिफारशीवरून ६० वर्षीय मल्ल्या यांचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने १५ एप्रिल रोजी निलंबित केला होता. मल्ल्या हे गेल्या महिनाभरापासून ब्रिटनमध्ये आहेत आणि ईडीसमक्ष हजर होण्यास टाळाटाळ करीत आहेत. मल्ल्या यांच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती ईडीने परराष्ट्र मंत्रालयाला केलेली आहे. मल्ल्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया एकदा प्रारंभ झाली की नंतर भारत सरकार ब्रिटनशी संपर्क साधेल आणि मल्यांना भारतात हद्दपार करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. मल्ल्यांच्या हद्दपारीसाठी दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण त्यांच्याविरुद्ध मुंबईच्या न्यायालयाकडून जारी झालेला अजामीनपात्र अटक वॉरंट आणि दुसरे कारण त्यांचा पासपोर्ट रद्द करणे हे आहे. मल्ल्या २ मार्च रोजी भारत सोडून ब्रिटनमध्ये गेले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द आता लक्ष प्रत्यार्पणाकडे
By admin | Published: April 25, 2016 4:13 AM