नवी दिल्ली : महाराष्ट्रासह तेरा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५ वर्षे वयाखालील बालकांमध्ये २०१५-१६ या वर्षाच्या तुलनेत कुपोषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असून, ही चिंतेची बाब आहे.त्यामध्ये केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा, मेघालय, मिझोराम, नागालँड, तेलंगणा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, गुजरात आदी राज्ये, तसेच लक्षद्वीप, दादरा-नगर हवेली, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील निष्कर्षात म्हटले आहे की, वजन अतिशय कमी असलेल्या बालकांचे प्रमाण १६ राज्यांमध्ये वाढत आहे. या बालकांचे वय ५ वर्षांपेक्षा कमी आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी की, पाच वर्षे वयाखालील बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी आहे.गरीब कुटुंबांतील बालकांना सकस आहार देण्याच्या केंद्र सरकारच्या योजनांना कोरोनाच्या काळात निधीच्या टंचाईमुळे कात्री लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कुपोषितांची आकडेवारीभारतामध्ये कुपोषितांची संख्या सुमारे १९ कोटी ५ वर्षांपेक्षा कमी वयाची जी बालके मरण पावतात, त्यातील ६८ टक्के मृत्यू हे कुपोषण व अन्य गंभीर कारणांमुळे होतात.२००२ ते २०१७ या कालावधीतील हे प्रमाण आहे. बालकांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या चार वर्षांत काही प्रमाणात घटले असले तरी कुपोषणाचे वाढते प्रमाण योग्य नाही, असे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटले आहे.
चिंताजनक! महाराष्ट्रासह १३ राज्यांत कुपोषणात झाली वाढ; केरळ, हिमाचल प्रदेशचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 2:50 AM