Mamata Banerjee Accident: पश्चिम बंगालमध्ये 'एकला चलो रे'चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला दुपारी अपघात झाला. बर्दवानहून परतत असताना ही घटना घडली. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, परतल्यानंतर ममता यांनी बुधवारी संध्याकाळी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. तसेच, या अपघाताविषयी मीडियाला माहिती दिली.
राजभवनातून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'ताशी 200 किमी वेगाने एक कार आमच्या ताफ्यात घुसली, ज्यामुळे माझ्या गाडीच्या ड्रायव्हरला अर्जंट ब्रेक लावावा लागला आणि माझे डोके समोर डॅशबोर्डवर आदळले. माझ्या कारचा काच खाली केलेला होता, जर तो बंद असता तर फुटून मला लागला असता आणि माझा जीवही जाऊ शकत होता.' दरम्यान, या घटनेनंतर ममता बॅनर्जींच्या कपाळावर छोटीशी पट्टीही बांधण्यात आली आहे.
पोलीस अपघाताचा तपास करणार हा कट होता की अजून काही, यावर बोलण्यास ममतांनी नकार दिला. पण, त्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वीही जखमी झाल्या ममता यापूर्वी ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी जोरदार वाऱ्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. नंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांना सेप्टिक झाले आणि उपचारासाठी महिनोन महिने घरून काम करावे लागले. 2021च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नंदीग्राममध्ये प्रचार करताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांनी आपला संपूर्ण निवडणूक प्रचार व्हीलचेअरवर बसून केला. मात्र, दुखापतीबाबत ममता बॅनर्जी राजकारण करत असल्याचा आरोपही भाजपने तेव्हा केला होता.