मणिपूरमध्ये अत्याचार करणाऱ्यांवर केंद्राने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत, कारण त्यांचे सरकार पीएम केअर फंड, राफेल डील आणि नोटाबंदीसारख्या मुद्द्यांनी घेरलेले आहे, असेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांची ही प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी जी-20 भ्रष्टाचारविरोधी मंत्रिस्तरीय बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केल्यानंतर आली आहे. भारतात भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरेंसचे कठोर धोरण असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले होते. पंतप्रधान कोणत्याही पुराव्याशिवाय विरोधकांवर आरोप करत आहेत. कारण भाजपला देशातील गरीब लोक जगू इच्छित नाहीत. पंतप्रधान देशाची दिशाभूल करत आहेत. ते कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत आहेत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
देशात कोणीही राहू नये, अशी भाजपची इच्छा आहे. भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याने ते भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. याचबरोबर, मणिपूर प्रकरणावर आरोप करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपने ईशान्येकडील मणिपूर राज्यातील अत्याचारात सहभागी असलेल्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच, पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान 15-16 लोक मारले गेल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील ग्रामीण निवडणुकांदरम्यान ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर दहशत पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. ते म्हणाले होते की, असा धोका असूनही लोकांनी भाजपच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा वापर विरोधकांना धमकावण्याचे साधन म्हणून करण्यात आला. मात्र असे असतानाही बंगालच्या जनतेने आपल्या प्रेमामुळे लोक जिंकले आहेत.