कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इटली (रोम) येथे होणाऱ्या जागतिक शांतता परिषदेत सहभागी होऊ शकणार नाहीत. भारत सरकारने त्यांना रोमला जाण्यास परवानगी दिली नाही आहे. भारत सरकारच्या या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर्मन चान्सलरला बोलावण्यात आले, पोपला बोलावण्यात आले, मुस्लीम असल्याने इमामला बोलावण्यात आले आणि मला हिंदू म्हणून बोलावण्यात आले होते. तुम्ही हिंदू धर्माबद्दल बोलता, मग याठिकाणी मला जाण्याची काय अडचण आहे? याचे एकमेव कारण म्हणजे हे लोक माझ्याबद्दल खूप तिरस्कार करतात. त्यामुळे मला जाण्याची परवानगी दिली नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. (mamata banerjee attacks modi government after denial of her italy rome peace conference visit)
याचबरोबर, शांतता परिषदेत सहभागी होण्यासाठी मी भारत सरकारकडे दोन महिन्यांपूर्वी परवानगी मागितली होती. इटालियन सरकारने मला परिषदेला उपस्थित राहण्याचे विशेष आमंत्रण पाठवले होते. पण, आज केंद्र सरकारकडून एक पत्र पाठवण्यात आले. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, मुख्यमंत्र्यांनी तेथे जाणे योग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच, माझा सवाल आहे की, पंतप्रधान अमेरिकेत कसे गेले? तुम्ही मला रोममध्ये भारताचे प्रतिनिधित्व का करू दिले नाही? तुम्ही प्रत्येक वेळी तेच करता, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांना बाहेर का जाऊ दिले जात नाही, असे त्या म्हणाल्या. ज्यावेळी मला कुठेतरी जायचे आहे, त्यामध्ये व्यत्यय आला आहे. परंतु तुम्ही संपूर्ण जग प्रवास करू शकता. लसीमुळे बरेच लोक अमेरिका, यूके किंवा इतर देशांमध्ये जाऊ शकत नाहीत. पण आपले पंतप्रधान कुठेही जाऊ शकतात. त्यांच्यासाठी काही विशेष ऑर्डर आहे का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. माझी पंतप्रधानांच्या दौऱ्याला हरकत नाही, पण मला परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून का रोखले जात आहे? तुम्ही प्रत्येक वेळी हे करू शकत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
यापूर्वी ममता बॅनर्जी यांचा चीन दौरा रद्द करण्यात आला होता. दरम्यान, जागतिक शांतता परिषदेचा कार्यक्रम 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी रोममध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, पोप आणि इटलीच्या प्रमुख राजकीय नेत्यांना आमंत्रित केले आहे. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्यासोबत आमंत्रित करण्यात आले होते. पण आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कार्यक्रमाचा भाग बनू शकणार नाहीत.