कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (14 जून) संपावर गेलेल्या डॉक्टरांना चार तासांचा अल्टीमेटम दिला होता. तसेच डॉक्टरांना चार तासांत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. कामावर रुजू होण्याच्या आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. गुरुवारी ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारच्या एसएसकेएम रुग्णालयाला भेट दिली. यावेळी शिकाऊ डॉक्टरांना कामावर येण्यास सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली.
ममता बॅनर्जी यांनी राज्यात सुरू असलेली निदर्शन ही राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा डाव असून आपण त्याचा निषेध करते. डॉक्टरांनी पुकारलेला संप हा माकप आणि भाजपाचा कट आहे असं म्हटलं आहे. माकपच्या सहकार्याने भाजप हिंदी-मुस्लीम राजकारण करत आहे. त्यांचे हे प्रेम पाहून आपल्याला धक्का बसला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जातीय तणाव निर्माण करण्यास खतपाणी घालत आहेत आणि फेसबुकवर अपप्रचार करत आहेत, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टारांचा वाद चिघळला आहे. येथील ज्युनिअर डॉक्टर आंदोलन करत आहेत. तर त्यांना समर्थन देण्यासाठी सीनिअर डॉक्टर समोर आले आहेत. यामुळे बुधवारी बंगालमधील आरोग्य सेवा ठप्प झाली होती. मंगळवारी ज्युनिअर डॉक्टरांनी आंदोलन सुरु केले. त्यावेळी एका शिकाऊ डॉक्टरासोबत कोलकातामधील रुग्णालयात मारहाण झाल्याचे समोर आले. रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे शिकाऊ डॉक्टराला मारहाण करण्यात आली होती.
या घटनेमुळे बुधवारी सरकारी रुग्णालयातील ओपीडी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आपत्कालीन विभाग सुरु ठेवण्यात आला होता. पण, डॉक्टरांची अनुपस्थितीमुळे आरोग्य सेवेवर परिणा झाला होता. सरकारी रुग्णालयांशिवाय खासगी रुग्णालयांतील सेवेवर परिणाम झाला होता, कारण काही खासगी रुग्णालयांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला होता.
दरम्यान, एनआरएसच्या रुग्णालयाच्या एका ज्युनिअर डॉक्टरला सोमवारी मारहाण झाली होती. या मारहाणीच्या घटनेत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाला. त्यांना त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोलकात्यातील रुग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांनी काम बंद केले आणि सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. यावेळी डॉक्टरांनी पोलिसांवर सुद्धा आरोप केला की डॉक्टराला मारहण झाल्यानंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. याशिवाय, राज्य सरकारने डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन मंगळवारी दिल्यानंतरही आंदोलन सुरुच ठेवले होते.