पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अखेर डॉक्टरांच्या मागण्यांपुढे झुकावं लागलं आहे. कोलकाता येथील एका ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. आपल्या मागण्यांसाठी डॉक्टर रस्त्यावर उतरले, ते सातत्याने आंदोलन करत आहेत. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्युनिअर डॉक्टरांच्या पाचपैकी तीन मागण्या मान्य केल्या, त्यानंतर आंदोलकांचा राग थोडा कमी होण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जींनी कोणत्या मागण्या केल्या मान्य?
- कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना हटवण्यात येणार आहे.
- कोलकाता (नॉर्थ) डेप्युटी कमिश्नरसह चार अधिकाऱ्यांनाही हटवण्यात येणार आहे.
- आरोग्य विभागाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांनाही हटवण्यात येणार आहे.
सोमवारी रात्री सहा तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मला वाटतं की ही बैठक सकारात्मक होती. मला खात्री आहे की, तेही असाच विचार करतात. अन्यथा आम्ही बैठकीच्या इतिवृत्तांवर सही का करू? ते त्यावर सही का करतील? डॉक्टरांच्या ९९ टक्के मागण्या मान्य केल्या आहेत, कारण ते आमचे धाकटे भाऊ आहेत."
राज्याने कोणती आश्वासनं दिली?
- रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी मान्य करून ममता बॅनर्जी यांनी त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य सेवा संचालकांना पदावरून हटवण्याबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांची योग्य पदांवर बदली केली जाईल.
- ममता बॅनर्जी म्हणाल्या, "आम्ही त्यांचा अपमान करत नाही. ते बऱ्याच काळापासून या पदावर नाहीत. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे की, त्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही, त्यामुळे त्यांना हटवण्याचे मान्य केलं आहे."
- ममता यांनी यापूर्वी सांगितले होतं की, कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना दुर्गापूजेपर्यंत पदावर कायम ठेवण्यात येईल. अनेकवेळा राजीनामा देण्यास सांगितलं होतं, परंतु त्यांनी पदावर राहावे अशी इच्छा होती.
- ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार-हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपामुळे विनीत गोयल यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालय आणि कोलकाता उच्च न्यायालयाने अनेकदा भाष्य केलं होतं.
- गेल्या आठवड्यात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने रुग्णालयाचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अटक केली होती.