पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी त्यांचे सख्खे भाऊ बुबुन बॅनर्जी यांच्याशी असलेलं नातं तोडलं आहे. ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय त्यांच्या भावाने हावडा येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर घेतला आहे. दरम्यान, बुबुन बॅनर्जी हे भाजपाच्या तिकिटावर हावडा येथून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
भावाशी असलेलं नातं तोडण्याचा निर्णय घेतल्यावर ममता बॅनर्जी यांनी भाऊ बुबुन बॅनर्जी याच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, तो आता माझा भाऊ राहिलेला नाही. आजपासून मी त्याच्याशी असलेलं नातं तोडत आहे. माझं कुटुंब आणि मी स्वत:ला त्याच्यापासून दूर करत आहोत. जेव्हा आमच्या वडिलांचं निधन झालं होतं तेव्हा पालन पोषण कसं झालं होतं, हे तो विसरला आहे. तो तेव्हा अडीच वर्षांचा होता. मी ३५ रुपये कमवायची आणि त्याचं पालन पोषण करायची, अशी आठवण ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितली.
दरम्यान, या घटनेनंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांचं सरकार आणि पक्षावर नियंत्रण राहिलेलं नाही. आता त्यांच्या भावानेच तृणमूल काँग्रेसविरोधात बंडखोरी केली आहे. त्यांनी तृणमूलचे उमेदवार प्रसून मुखर्जी यांच्या नावाबाबत असहमती दर्शवली. हा ममता बॅनर्जींकडून अभिषेक बॅनर्जी यांना इतरांपेक्षा अधिक प्राधान्य देण्याचा परिणाम आहे.
तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये १६ विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दर्शवण्यात आला आहे. तर नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांच्यासह सात खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी २३ जागांवर विजय मिळाला होता. यावेळी ममता बॅनर्जी यांनी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बरहामपूर येथून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.