‘इंडिया’ला पहिला तडा? ममतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची सावध प्रतिक्रिया, केलं असं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 02:05 PM2024-01-24T14:05:04+5:302024-01-24T15:48:34+5:30
INDIA Opposition Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र गेले काही महिने अडखळत घडपडत मार्गाक्रमण करत असलेल्या या आघाडीला पहिला तडा गेला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र गेले काही महिने अडखळत घडपडत मार्गाक्रमण करत असलेल्या या आघाडीला पहिला तडा गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर काँग्रेसकडून सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, ममता बॅनर्जींना वगळून इंडिया आघाडीची कल्पना करता येणार नाही. ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीचा महत्त्वाचा भाग आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघाल्यावर रस्त्यामध्ये काही गतिरोधक येतातच. मात्र त्यातून काही ना काही मार्ग काढला जाईल.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. इथे इंडिया आघाडीतील जागावाटपामध्ये काँग्रेसने १२ जागांची मागणी केली होती. मात्र ममता बॅनर्जींनी काँग्रेसला केवळ २ जागा देऊ केल्या होत्या. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, आज सकाळी ममता बॅनर्जी यांना आपला निर्णय जाहीर करत बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडले. त्या म्हणाल्या की, माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये , आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, असे ममता यांनी म्हटले आहे.