पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना भाजपा नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासण्याचे आव्हान दिले. कूचबिहारमधील एका सभेला संबोधित करताना बॅनर्जी यांनी आरोप केला की, भाजपा निवडणुकीपूर्वी टीएमसीविरोधात केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत आहे.
त्यांनी असेही सांगितले की, आयटी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आणि ट्रायल रनपूर्वी पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरची झ़डती घेतली. परंतु काहीही सापडले नाही. त्या आयटी अधिकाऱ्यांनी दावा केला होता की हेलिकॉप्टरमध्ये पैसे आणि सोने असल्याचे इनपुट होते, परंतु त्यांना काहीही सापडलं नाही.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अशा गोष्टींमध्ये भाजपाचा हात आहे, पण केंद्रीय एजन्सीचे अधिकारी भाजपा नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासण्याची हिंमत कधी करतील का? तृणमूल काँग्रेसने रविवारी सांगितलं की, अभिषेक बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरवर कोलकाता येथील बेहाला फ्लाइंग क्लबमध्ये आयटी अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि आरोप केला की, विरोधी उमेदवारांना त्रास देणं आणि त्यांना धमकावण्याचा हा भाजपाचा हेतुपुरस्सर डाव होता.
टीएमसीच्या 'छापे'च्या दाव्यावरून वाद निर्माण झाला आहे. आयटी विभागातील सूत्रांनी दावा केला की, झडती किंवा सर्वेक्षणासारखी कोणतीही कारवाई केली गेली नाही आणि टीएमसी नेते हेलिकॉप्टरमध्ये देखील उपस्थित नव्हते. ममता यांनी भाजपावर केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केल्याचा आरोपही केला आणि भाजपा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या काही दिवस आधी आमच्या नेत्यांना अटक करण्यासाठी NIA वापर करू शकते असंही म्हटलं आहे.