पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीम इंडियाच्या जर्सीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्व काही भगव्या रंगात रंगवलं जात आहे असं म्हणत थेट भाजपावर निशाणा साधला आहे. ममता यांच्या या विधानाला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ममता यांनी संपूर्ण कोलकाता निळ्या-पांढऱ्या रंगात रंगवला आहे असं भाजपाने म्हटलं आहे.
जगधात्री पूजेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे. "आता सर्व काही भगवं होत आहे. आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे आणि मला विश्वास आहे की ते विश्व विजेते होतील... पण जेव्हा ते सराव करतात तेव्हा त्यांचा पेहरावही भगवा झाला आहे. पूर्वी ते निळ्या रंगाचे कपडे घालायचे. आता मेट्रो स्टेशनलाही भगवा रंग दिला जात आहे" असं म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी कोणाचंही नाव न घेता याचा निषेध केला. "पुतळे उभारण्यास माझा आक्षेप नाही, पण ते सर्व काही भगव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ता येते आणि जाते. हा देश जनतेचा आहे, फक्त एका पक्षाचा नाही" असं भाजपावर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममतांच्या या वक्तव्यावर भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपा नेते शिशिर बाजोरिया यांनी "सरावाच्या वेळी भगव्या रंगाची जर्सी घातल्यामुळे टीम इंडियाचे भगवीकरण झाल्याचं त्या म्हणतात, तर मग सर्वात वर भगवा रंग असलेल्या तिरंग्याचं काय?, सूर्याच्या पहिल्या किरणाचा रंग काय असतो? त्यांनी स्वतः शहराला निळा आणि पांढऱ्या रंगात रंगवलं आहे" असं म्हणत ममतांवर हल्लाबोल केला आहे.