नवी दिल्ली : भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान नाहीत. राष्ट्रीय नागिरक नोंदणी (एनआरसी) लागू करायचे की नाही, याबाबत केंद्र सरकारचा निर्णय असेल. त्यामुळे ममता बॅनर्जी चितेंत का आहेत, असा सवाल कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.
जर केंद्र सरकार एनआरसी लागू करण्याचा निर्णय घेणार असेल, तर याबाबत त्या (ममता बॅनर्जी) काहीच करू शकणार नाहीत. कारण, हा निर्णय केंद्र सरकारचा असणार आहे, असेही कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले. याआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला होता. सोमवारी जगदीप धनखड यांनी बोलविलेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कोणत्या तरी प्रकारची सेंसरशिप आहे, त्यांना वाटत आहे.
दरम्यान, जिल्हा अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय दौरे पाहता राज्यपाल जगदीप धनखड यांच्या बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दर्शविला होता. राज्यपाल जगदीप धनखड यांनी अधिकाऱ्यांच्या नकाराला 'असंवैधानिक' असल्याचे म्हटले आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी गेल्या आठवड्यात उत्तर आणि दक्षिण 24 परगना जिल्ह्यांचे जिल्हादंडाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि निर्वाचित खासदारांसोबत बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.