कोलकाता: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. महाराष्ट्रातील या राजकीय रणधुमाळीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील घडामोडींना भाजप जबाबदार असल्याची टीका करत, सर्व बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्यायला हवे. आम्ही योग्य तो पाहुणचार करु, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला २४ तासांचे अल्टिमेटम दिला असून, मुंबईत परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महाविकास आघाडीतून प्रथम बाहेर पडा, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. उलट, गुवाहाटीवरून परतलेल्या शिवसेना आमदारांनी केलेल्या आरोपांना तेथील आमदारांनी व्हिडिओ जारी करत खोडून काढले आणि पक्षप्रमुखांना यांच्यापासून सावध राहावे, असा सल्लाही दिला. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत आता राष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आसाममधील बंडखोरांना पश्चिम बंगालला पाठवा
उद्धव ठाकरेंसह आम्हाला सर्वांना न्याय हवा आहे. आताच्या घडीला (भाजप) सत्तेत आहे. पैसा, मसल, माफिया शक्ती वापरत आहात. पण एक दिवस जावे लागेल. तुमचा पक्षही कोणीतरी फोडू शकतो. हे चुकीचे आहे आणि मी त्याचे समर्थन करत नाही, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला. तसेच आसामऐवजी त्यांना (बंडखोर आमदार) बंगालमध्ये पाठवा. आम्ही त्यांचे चांगले आदरातिथ्य करू. महाराष्ट्रानंतर ते इतर सरकारही पाडतील. आम्हाला लोकांसाठी, संविधानाला न्याय हवा आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेतील हे तिसरे मोठे बंड आहे. मात्र, अशावेळी शिवसैनिक कायम नेतृत्वाच्या पाठीशी राहतात. अशा बंडावेळी शिवसेनेत नेते एकाबाजूला राहतात आणि शिवसैनिक एकाबाजूला राहतात. बंडखोरांना शिवसैनिक योग्य जागा दाखवून देतील. बंडखोरी करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असे सांगत एक प्रकारे अजित पवार यांनी क्लीन चिट दिली.