कोलकाता - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा वेगाने सुरु झाली आहे. त्यात दुसरीकडे इंडिया आघाडीतील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सहभागी होणार नाही. काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यात जागावाटपावरून मतभेद झालेत. त्यात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींना बेईमान आणि अहंकारी अशा शब्दात निशाणा साधला आहे. त्यामुळे त्याचे पडसाद इंडिया आघाडीवर उमटू लागले आहेत.
माध्यमांशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात ममता बॅनर्जी नेत्या बनल्या. परंतु ही महिला इतकी बेईमान आहे, किती अहंकारी आहे की ज्या लोकांनी तिला राजकारणात उभं केले ती त्याच लोकांना अहंकार दाखवत आहे. सोनिया गांधी तुमच्याकडे भीक मागत नाही. तुमचा अहंकार एक दिवस मोडणार आहे. तुम्हाला मोदींना हरवायचे नाही त्यामुळे जागावाटपात तडजोड करण्यास तयार नाही. भाजपा हिंदुत्वाचे राजकारण करते आणि तुम्ही हिंदुत्व रोखण्याचे. तुम्ही एकमेकांशी हातमिळवणी केलीय. मोदी अयोध्या किर्तन गातायेत तर तुम्ही गंगासागर किर्तन. अयोध्या आणि गंगासागर याआधी नव्हते का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
काँग्रेसनं ममता बॅनर्जी यांच्यावर टीएमसी आणि भाजपा एकत्र असल्याचा आरोप केलाय. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर तिखट वार केलेत. काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की, ममता यांच्याकडे कुणी भीक मागितली माहिती नाही. आम्ही तर भीक मागितली नाही. आघाडी हवी असं ममता बॅनर्जी स्वत: सांगतायेत. आम्हाला ममता यांच्या दयेची गरज नाही. आम्ही आमच्या ताकदीवर निवडणूक लढू शकतो. पण ममता बॅनर्जी यांनाच ही आघाडी नको. ममता मोदींच्या सेवेत आहेत असं त्यांनी म्हटलं होते.
दरम्यान, आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीला आणखी मजबूत करणे आणि जागावाटपावर रणनीती बनवून संयोजकाची नियुक्ती करणे यावर चर्चा होणार आहे. परंतु या बैठकीला ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष सहभागी होणार नाही. पश्चिम बंगालमधील काही नियोजित कार्यक्रमासाठी ते सहभागी होणार नाही असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही आजच्या बैठकीला सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. उद्धव ठाकरे आज कल्याण लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघाचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे करतात.