मुंबई - बलाढ्य भाजपला शह देणे देशातील कोणत्याही नेत्याला वा पक्षाला शक्य नाही, असं चित्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालं आहे. त्यामुळे भाजपसोबत किंवा भाजपला समांतर भूमिका घेण्यावर नेत्यांचा कल दिसून येतो. मात्र महाराष्ट्रात याउलट झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रखर झुंज देत भाजपची सत्ता उलथून टाकली आहे. यामुळे भाजपशी दोन हात करत असलेल्या ममता बॅनर्जी यांना बळ मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपकडून ममता यांना सतत टार्गेट करण्यात येत असून त्यांची प्रतिमा खराब कऱण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. परंतु, ममता दीदी देखील पाय रोवून भाजपचे आक्रमण रोखून धरत आहेत.
महाराष्ट्रातही भाजपला शह देण्यासाठी शरद पवारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. शिवसेनेला आपल्या सोबत घेऊन भाजपला रोखण्याची योजना पवारांची होती. मात्र त्यांच्या योजनेला त्यांचेच पुतणे अजित पवार हे सुरंग लावण्याच्या तयारीत होते. मात्र न्यायालय आणि मित्र पक्षांच्या विश्वासाच्या जोरावर शरद पवार यांनी भाजपला शह देण्यात यश मिळवले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.
बलाढ्य असलं तरी भाजपला शह देता येतो हा संदेश शरद पवार यांनी देशाला दिला. महाराष्ट्रात विरोधकांचा झालेला विजय ममता दीदींना बळ देणारा ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली असून येथे लढत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्येच होणार आहे.