नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखली आहे. त्यात भाजपाचा पराभव करण्यासाठी देशभरातील २५ हून अधिक विरोधकांनी एकत्र येत INDIA आघाडीची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीची आतापर्यंत २ बैठका झाल्या आहेत. तर तिसरी बैठक लवकरच मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या TMC ने ममता बॅनर्जी यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी पुढे आणण्यची योजना तयार केली आहे.
लोकसभा निवडणुकीला १ वर्षाहून कमी काळ बाकी आहे. त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे करण्याची तयारी तृणमूल काँग्रेसनं केली आहे. रविवारी पक्षाच्या बैठकीत टीएमसी नेत्यांनी ही मागणी केली. पक्षाच्या सोशल मीडिया टीमलाही ममता यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याची सूचना करण्यात आली आहे. टीएमसी नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया पेजवर ममता बॅनर्जींना आगामी पंतप्रधान म्हणून पोस्ट करण्यात आल्या आहेत.
याबाबत टीएमसी नेते फरीद हकीम यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाच्या चांगल्या उमेदवार ठरतील. कुणाकडूनही ममता बॅनर्जी यांच्या नावाला विरोध होणार नाही. आम्ही राज्यातील ४२ पैकी ४२ जागा जिंकण्याची तयारी करत आहोत. जोपर्यंत इंडिया आघाडी एनडीए सरकारचा पराभव करत नाही तोवर आम्ही थांबणार नाही असंही त्यांनी म्हटलं. तर पुढील वर्षी लाल किल्ल्यावर एका महिलेने तिरंगा फडकावा हे आमचे स्वप्न आहे ममता बॅनर्जी या पंतप्रधानपदाच्या मजबूत दावेदार आहेत. त्या आतापर्यंत ७ वेळा खासदार होत्या तसेच केंद्रीय मंत्रीही राहिल्या आहेत. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे हे आमचे ध्येय आहे असं टीएमसी प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितले.
काय आहे योजना?
सोशल मीडिया कॅम्पेनमध्ये ममता बॅनर्जी यांच्या स्लोगनवाले रिल्स, ग्राफिक्स बनवण्यात येतील. ज्यात ‘बोलचे बंगलार जोनोता, प्रधानमंत्री होक ममता’ त्याचा अर्थ बंगालच्या लोकांनी घोषणा केलीय, ममता बॅनर्जींना पंतप्रधान बनवायचंय असं पोस्टर्स व्हायरल केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी बनवली आहे. या आघाडीने अद्याप पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला नाही. पंतप्रधानपदासाठी बिहारच्या नितीश कुमार, प.बंगालच्या ममता बॅनर्जी आणि राहुल गांधीसह इतर नावे चर्चेत आहेत. मात्र काँग्रेसला पंतप्रधानपदाची लालसा नाही असं पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे.