Mamata Banerjee on BJP Protest: कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ भाजपने पश्चिम बंगाल बंदची हाक दिली. तर विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे. पश्चिम बंगाल बंदला हिंसक वळण मिळाले असून, हा भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
भाजपच्या पश्चिम बंगाल बंद आणि विद्यार्थी आंदोलनाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "हे भाजपचे कटकारस्थान आहे, ते मी यशस्वी होऊ देणार नाही. मी सुद्धा विद्यार्थी जीवनात राजकारण केले आहे. मी कोलकाता पोलिसांना सलाम करते. पोलिसांनी संयमाने कोलकात्याचे रक्षण केले."
'भाजपकडून तपास यंत्रणाची भीती दाखवून दबाव'
"भाजप होईल तितके कटकारस्थान करावे. यशस्वी होणार नाही. पूर्ण भारतात भाजप कुठेही जिंकणार नाही. भाजप तपास यंत्रणांची भीती दाखवून लोकांवर दबाव टाकत आहे. माझ्याविरोधात खोटा प्रचार करत आहे", असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
"आजचा दिवस मी आरजी कर रुग्णालयातील पीडितेला समर्पित करू इच्छिते. ती आमची छोटी बहीण होती. उत्तर प्रदेश, मणिपूरसह अनेक राज्यात असे घडले आहे. मी हा दिवस त्या पीडितांना समर्पित करते. आरोपींना फाशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. आम्हाला न्याय हवा आहे, पण भाजप जे करत आहे त्यावरून दिसतेय की त्यांना भाजपला न्याय नकोय", असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मोदींच्या विरोधात बंद करा -ममता बॅनर्जी
"राज्यातील पोलिसांना मारहाण केली. गाड्या जाळल्या. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव बनवला. हे सगळे भाजप करत आहे. भाजपला न्याय नकोय. जर बंद करायचा असेल, तर मोदींच्या विरोधात करा. उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थानात गुन्हे घडत आहे, त्यावर भाजप काहीच का बोलत नाही", असा सवाल ममता बॅनर्जींनी केला.