कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ममतांचा ताफा जात असताना 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर ममता भडकल्या असल्याचा हा व्हिडीओ पश्चिम बंगाल भाजपाच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. मात्र या व्हिडीओची चर्चा रंगल्यानंतर तृणमूल काँग्रेसने हा व्हिडिओ बनावट असून भाजपा त्याच्या नेहमीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.
पश्चिम बंगालमधील चंद्रकोण येथील आरामबाग येथील उमेदवाराच्या प्रचारार्थ एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही भाजपा कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या. ममतांनी या कार्यकर्त्यांवर शिव्या देत असल्याचा आरोप केला आहेत.
पश्चिम बंगालच्या भाजपाच्या ट्विटर हँडलवरून या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'जय श्रीराम' च्या घोषणांनी दीदी इतक्या नाराज का आणि या घोषणांना शिव्या का म्हणतात, असं कॅप्शनही देण्यात आले आहे. मात्र हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपा या व्हिडिओद्वारे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबतचे एक ट्वीटही त्यांनी केले आहे.
तृणमूलच्या आमदारांबाबत मोदी यांचे वक्तव्य घटनाविरोधी, ममता यांची टीकानिवडणूक प्रचारात पश्चिम बंगालमध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) 40 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील भद्रेश्वर येथील सभेत मोदी यांच्यावर मंगळवारी कडाडून हल्ला चढविला होता. 'मोदी यांनी केलेले विधान घटनाबाह्य आहे. आमच्या पक्षाचे काम कार्यकर्त्यांच्या त्यागावर चालते. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. एक कार्यकर्ता पक्ष सोडून गेला तर आम्ही १ लाख आणखी कार्यकर्ते निर्माण करू. मोदी यांच्या अशा विधानामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे. घटनात्मक पदावर असतानाही ते घटनेचे उल्लंघन करत आहेत. त्यांना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार नाही' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.