काँग्रेसला ममता बॅनर्जींनी दिला धक्का! अरविंद केजरीवाल म्हणाले, 'थँक यू दीदी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:41 IST2025-01-08T18:38:09+5:302025-01-08T18:41:03+5:30
Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्लीत त्रिशंकू निवडणूक होत असून, ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसला ममता बॅनर्जींनी दिला धक्का! अरविंद केजरीवाल म्हणाले, 'थँक यू दीदी'
Delhi Elections 2025: हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अपयशावर बोट ठेवत दिल्लीत केजरीवालांना फारकत घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी दुभंगल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत त्रिशंकू निवडणूक होत असून, आता तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसला झटका दिला आहे. तृणमूल काँग्रेसने दिली विधानसभा निवडणुकीबद्दलची भूमिका जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींचे आभार मानले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. बुधवारी यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जींचे आभार मानले.
अरविंद केजरीवाल काय बोलले?
"तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. मी वैयक्तिकरित्या ममता दीदींचा आभारी आहे. धन्यवाद दीदी, तुम्ही नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात आम्हाला पाठिंबा दिला आहे", असे अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून सांगितले.
केजरीवालांच्या ट्विटनंतर तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार डेरेक ओब्रायन यांनीही प्रतिक्रिया दिली. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे ते म्हणाले.
TMC has announced support to AAP in Delhi elections. I am personally grateful to Mamta Didi. Thank you Didi. U have always supported and blessed us in our good and bad times.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 8, 2025
इंडिया आघाडीत बिघाडी?
हरयाणात समाजवादी पक्षाला सोबत घेण्यास काँग्रेसने नकार दिला होता. त्यानंतर दिल्लीतही इंडिया आघाडी दुभंगल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे इंडिया आघाडीचे घटक आहेत. पण, त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.
त्यानंतर इंडिया आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर नेतृत्व करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.