कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आगामी भवानीपूर पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसद्वारे रिंगणात उतरणार आहेत. 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत ममत बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाने प्रियांका टिबरेवाल यांना तिकीट दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी काल भवानीपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. ममता बॅनर्जी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे केवळ 69,255 रुपये रोख आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा निवडणुकीआधी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. यामध्ये त्यांनी त्याच्या एका बँक खात्यात 12,02,356 रुपये जमा असल्याचे दाखवले आहेत. तसेच एकूण बँक बॅलन्स 13,53,356 रुपये दाखवले आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणून 18,490 रुपये आहेत. याचबरोबर, 9 ग्रॅम दागिने आहेत, ज्याची बाजार किंमत 43,837 रुपये आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला. आता मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी ममता बॅनर्जी यांना उपनिवडणुकीत विजय मिळवणे गरजेचे आहे. 2 मे रोजी झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीच्या भाजपाचे शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला होता. यानंतर, ममता बॅनर्जी यांनी आता भवानीपूर येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत निवडणूक लढवत आहे.
ममता बॅनर्जींविरोधात भाजपाच्यावतीने लढणाऱ्या प्रियंका टिबरेवाल पेशाने वकील आहेत आणि भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षही आहेत. 2014 साली प्रियंका तिबरेवाल भाजपात सामील झाल्या होत्या. तसेच, त्या खासदार बाबुल सुप्रियो यांच्या कायदेशीर सल्लागारही राहिल्या आहेत. भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादीही भाजपाने जाहीर केली आहे, ज्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि हरदीप पुरी यांच्या नावांचाही समावेश आहे.
भवानीपूरमध्ये 30 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे तर 3 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. ममता बॅनर्जी या भवानीपूरच्याच रहिवासी आहेत. त्यांनी 2011 आणि 2016 अशा दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला होता.