Mamata Banerjee : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत एक अजब विधान केले आहे. एका सभेत बोलताना ममता म्हणाल्या, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या रेशनच्या पाकिटांवर पंतप्रधान मोदींचा फोटो आहे. मी उपाशी राहून मरण पत्करेन, पण *#$& मोदींचा फोटो असलेले राशन खाणार नाही.
ममतांच्या या वक्तव्यावरून भाजपने त्यांना धारेवर धरले. भाजप नेत्या सुकांता मजुमदार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनीदेखील ममतांचा व्हिडिओ X वर पोस्ट करत निशाणा साधला.
काय म्हणाल्या ममता?पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या जाहीर सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. पण, एनआयए, सीबीआय आणि आयकर विभागातील किती अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या? बंगालची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. माझ्या काळात बंगालच्या जनतेला हात लावण्याची हिंमत कुणाचीही नाही.
संबंधित बातमी- 'तुम्ही विषारी सापांवर विश्वास ठेवू शकता, भाजपवर नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल
यावेळी त्यांनी सीएएवरुनही भाजपवर टीका केली. त्या म्हणतात, निवडणुकीपूर्वी CAA लागू केला. तुम्ही नोंदणीसाठी (CAA नागरिकत्वासाठी) तुमचे नाव द्याल, तेव्हा तुम्हाला बांगलादेशी घोषित केले जाईल. टीका करणे माझा लोकशाही अधिकार आहे. भाजप आता गुंडगिरी करत आहे. भाजप सीआयएसएफ, बीएसएफ, आयटी, एनआयएचा वापर करून लोकांना त्रास देत आहे, असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाकडे भाजपवर कारवाई करण्याचे आवाहन केले.