Giriraj Singh on Mamata Banerjee : कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली. ज्याप्रमाणे किम जोंग विरोधकांना सहन करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरोध सहन करू शकत नाहीत, असे गिरिराज सिंह म्हणाले.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून बंगाल सरकारवर हल्लाबोल करताना गिरिराज सिंह म्हणाले, आज जे लोक अत्याचार झालेल्या मुलीसोबत बंगालमध्ये दिसत नाहीत. पण, ते तुकडे तुकडे गँग ममता बॅनर्जी यांच्यासोबत दिसत आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या आहेत आणि त्यांनी आपली लोकप्रियता गमावली आहे. त्यामुळेच त्या असंवैधानिक गोष्टी बोलत आहेत. फेडरल स्ट्रक्चर तोडत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी आणि लालू यादव उभे आहेत, असे गिरिराज सिंह यांनी सांगितले.
याचबरोबर, गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जींच्या विधानावरही आक्षेप घेतला. त्यांनी ज्या पद्धतीने विधान केले आहे, ते लोकशाहीवादी व्यक्तीचे असू शकत नाही. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्याने त्यांची वागणूक उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यासारखीच आहे. किम जोंग उन यांना विरोधी पक्ष जसा आवडत नाही, तसाच ममता बॅनर्जी यांनाही विरोधी पक्ष आवडत नाही, असे गिरीराज सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. नुकतेच एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "लक्षात ठेवा, बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीतही जाळपोळ होईल". ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.
ममता बॅनर्जींच्या या विधानावर भाजप नेते सुकांत मजुमदार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. पत्रात सुकांत मजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानामुळे राज्यात अशांतता निर्माण होण्याची भीती सुकांत मजुमदार व्यक्त केली आहे.