कोलकाता - तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मुकुल रॉय लवकरच पक्षाचा आणि राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत. दुर्गापुजेनंतर राजीनामा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुकुल रॉय यांचा हा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजीनामा का देणार याबाबत त्याचवेळेस माहिती देईल असं ते म्हणाले.
'मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे. राजीनाम्याची अधिकृत घोषणा मी दुर्गापुजेनंतर करेन, अत्यंत दु:खी मनाने मी ही घोषणा करतोय' असं मुकुल रॉय पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
ममता बॅनर्जी यांच्यानंतर मुकुल रॉय यांच्याकडे पार्टीचा सर्वात मोठा चेहरा म्हणून पाहिलं जातं. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांचे संबंध ताणले गेले होते. काही दिवसांपूर्वी ममतांनी मुकुल रॉय यांना पदावरून हटवून त्यांच्याजागी राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांची नेमणूक केली होती. विशेष म्हणजे मुकुल रॉय यांच्याकडे ममता बॅनर्जींचे जवळचे आणि अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून पाहिलं जायचं.
मुकुल रॉय भाजपामध्ये जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुकुल रॉय यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेतली.