कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळाले. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, भाजपला मोठ्या फरकाने पराभूत करण्यात तृणमूल काँग्रेसला यश आले. परंतु, तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यामुळे गड आला, पण सिंह गेला, अशी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली. आता मात्र, ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (mamata banerjee likely to contest bypoll from bhabanipur after tmc mla resigns)
भाजपला रोखत ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावे लागणार आहे. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचे बोलले जात आहे.
“शरद पवार यांचेच धोरण प्रत्यक्षात खत दरवाढीस कारणीभूत”; भाजपची टीका
भवानीपूरमधील आमदाराचा राजीनामा
भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय राजीनाम देणार असल्याचे सांगितले जात आहे. भवानीपूर येथील आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मी राजीनामा देत आहे. हा पक्ष आणि माझा दोघांचाही निर्णय आहे. स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे चट्टोपाध्याय यांनी सांगितले. यानंतर रिक्त होत असलेल्या जागेवर ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चट्टोपाध्याय खरदह येथून निवडणूक रिंगणात
तृणमूल काँग्रेसचे नेते काजल सिन्हा यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक निकालापूर्वी सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले. मात्र, जनतेने कौल दिल्यामुळे निवडणूक निकालात ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. आता खरदह येथील रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर शोभनदेव चट्टोपाध्याय यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सन २०११ मधील विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधासभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. तेव्हा सुब्रत बख्शी यांनी त्यांच्यासाठी भवानीपूरची जागा सोडली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांना ९५ हजार मतांनी पराभूत केले होते, असे समजते.