पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना काही ना काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी सरकारनं 'मां किचन' ही योजना सुरू केली आहे. यापूर्वीही कर्नाटकात इंदिरा कॅन्टिन आणि तामिळनाडून अम्मा कॅन्टिन अशा योजना सुरू करण्यात आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योजनेमध्ये गरीबांना ५ रूपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. थाळीत पाच रूपयांत भात, भाजी, डाळ आणि एक अंड देण्यात येईल. दरम्यान, भारतीय जनता पक्षानं हा निवडणुकीचा स्टंट असल्याचं म्हणत यावर टीका केली. परंतु यानंतर तृणमूल काँग्रेसनंही भाजपवर पलटवार करत निडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केल्याचं म्हटलं. "हे मां किचन आहे. आपल्याला सर्वांना आपल्या आईचा अभिमान आहे. ज्या ठिकाणी आई असेल त्या ठिकाणी सर्वकाही चांगलंच असेल. आपण सर्वच आपल्या आईला सलाम करतो," असं या योजनेच्या उद्धाटनावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी दुआरे सरकार (सरकार तुमच्या दरवाज्यावर) आणि आरोग्य साथी (आरोग्य विमा) अशा योजना सुरू केल्या. दरम्यान, मां किचन या योजनेवरून भाजपनं ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. "बंगालमधील लोकांकडे आपली भूक भागवण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळेत त्यांना मां किचन सुरू करावं लागलं आहे जेणेकरून लोकांना पाच रूपयांत जेवणं मिळेल, त्या अयशस्वी ठरल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे. लोकं भिकारी बनले आणि आणि त्यांना पाच रुपयांत जेवण द्यावं लागतं आहे," असं म्हणत पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष यांनी निशाणा साधला. निवडणुकांच्याच वेळी दौरे का?"पंतप्रधान केवळ निवडणुकांच्या वेळीच या ठिकाणी एवढ्यांदा का येतात? ते या ठिकाणी केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी येतात. ती लोकं विनाकारण प्रश्न उपस्थित करत आहेत. ही कोणतीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली घोषणा नाही. कन्याश्री, रूपाश्री आणि आरोग साथी या योजना योग्यरित्या काम करत आहेत," अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे शहर विकास मंत्री फिरहद हकिम यांनी सांगितलं.