अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेस 22 जानेवारीला 'सद्भाव रॅली' काढणार आहे. ही रॅली सर्व धर्मांना मानणाऱ्या लोकांसाठी असेल, असे ममतांनी म्हटले आहे. याच दिवशी अयोध्येत रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमही आहे.
याशिवाय, तृणमूलच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये ब्लॉक स्तरावरही सर्व धर्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 'सर्व धर्म समान' अशी या रॅलीची थीम आहे. ममता बॅनर्जी 22 जानेवारीला कोलकाता येथील कालीघाट मंदिरालाही भेट देणार आहेत. यानंतर त्या रॅलीला सुरुवात करतील.
काय म्हणाल्या ममता? ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी 22 जानेवारीला एक रॅली करणार आहे. काली मंदिरापासून या रॅलीची सुरुवात होईल. या मंदिरात मी काली मातेची पूजा करेन आणि यानंतर आम्ही हाजरा येथून पार्क सर्कल मैदानापर्यंत एक आंतरधर्मीय रॅली काढणार आहोत. येथे एक बैठकही होईल. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांचेच स्वागत आहे. यावेळी सर्व धर्माचे लोक उपस्थित राहतील."
भाजपावर साधला होता निशाणा - ममता बॅनर्जी यांनी नुकतेत भाजपावर निशाणा साधत म्हटले होते की, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटनाच्या माध्यमाने नौटंकी केली जात आहे. मी अशा उत्सवावर विश्वास ठेवते, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. आपण निवडणुकीपूर्वी नौटंकी करत आहात. यामुळे मला काही समस्या नाही. मात्र, दुसऱ्या समाजाची अवहेलना करणे योग्य नाही.''