PM Modi Meets CM Mamata Banerjee:पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बंगाल दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या संदेशखलीमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकाता येथील राजभवनात बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितले की, त्यांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट ही प्रोटोकॉल बैठक होती आणि यादरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजभवन बैठक झाली. संदेशखलीमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरुन भाजपा आणि टीएमसी आमनेसामने आले आहेत. अशा परिस्थितीत ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी हुगळी जिल्ह्यातील आरामबाग विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि 7200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
संदेशखालीतील भगिनींनी अन्याविरुद्ध आवाज उठवला आणि ममता दीदींकडे मदत मागितली. या बदल्यात त्यांना काय मिळाले? सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी संदेशखालीतील माता-भगिनींसोबत जे काही केले, ते पाहून संपूर्ण देश दुःखी आणि संतप्त आहे. येथील भगिनी आणि मुलींसोबत त्यांनी अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दात आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
संदेशखलीत काय झाले?गेल्या काही दिवसापूर्वी बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेत शहाजहान शेखचे नाव समोर आले. याशिवाय, संदेशखली येथील अनेक महिलांचा छळ केल्याचा आरोप शहाजहान याच्यावर आहे. याशिवाय अनेकांनी जमीन बळकावल्याचाही आरोपही त्याच्यावर आहे. अनेक दिवस फरार असलेल्या शहाजहान शेखला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या शहाजहानविरोधात संदेशखलीतील अनेक महिलांनी तीव्र निदर्शने केली, यावेळी काही प्रमाणता हिंसाचारही झाला. आता या प्रकरमावरुन भाजपा आणि टीएमसी आमनेसामने आले आहेत. भाजपाने या मुद्द्याला उचलून धरले आहे.