नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी सध्या दिल्लीच्या दैऱ्यावर असून नरेंद्र मोदींकडे भेटण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानंतर आज त्यांनी पंतप्रधानांच्या निवास स्थानी जाऊन मोदींची भेट घेतली आहे.
ममता बॅनर्जींना केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींची कट्टर विरोधक म्हणून ओळखिले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील दोघांमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. त्यातच आता नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कोळसा खाणीचे उद्घाटन करण्याची विनंती केली असल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले आहे.
ममता दीदी भेटीनंतर म्हणाल्या की, पंतप्रधानांना जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कोळसा खाणीचे उद्घाटन करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगाल राज्यासाठी केंद्र सरकारकडे 13500 कोटींची मागणी करण्यात आली असून राज्याचे नाव बदलण्याची मागणी देखील या भेटीमध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना देखील भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी वेळ दिला तर मी उद्याही त्यांना भेटण्यास तयार असल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना नेहमीप्रमाणे कुर्ता आणि मिठाई भेट दिली. नरेंद्र मोदी केंद्रात आल्यापासून दोन्ही नेत्यांचे संबंध चांगले नव्हते. मात्र या सर्व कटुतांच्या दरम्यान ममता दीदी वर्षातून एकदा पंतप्रधान मोदींना एक किंवा दोन कुर्ते पाठवतात. तसेच याचा खुलासा देखील खुद्द पंतप्रधान मोदींनीच केला होता.