नवी दिल्ली : टीएमसी (TMC) खासदार आणि पार्टीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी रविवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केवळ बंगालच नाही तर इतर राज्येही येत्या काळात विजयाची नोंद करतील. सध्या टीएमसी हा एकमेव पक्ष आहे, जो बाहेरील लोकांसमोर न झुकता संपूर्ण ताकदीने लढाई लढत आहे. आम्ही त्रिपुरा आणि आसामला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही गोव्यालाही जाऊ. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पंतप्रधान मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जींनी भवानीपूरच्या जग्गु बाजारात प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या अशी अनेक राज्ये आहेत जी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाविरोधात लढण्यास तयार आहेत. तृणमूल काँग्रेस बंगालपुरती मर्यादित राहणार नाही. ही पार्टी राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा विस्तार करेल, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. भाजपाकडे बोट दाखवत ते म्हणाले की, लवकरच आपण गोव्यालाही जाऊ, म्हणून स्वतःला तयार करा कारण आम्ही राजकीय लढाई करण्यास तयार आहोत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इटलीमधील रोममध्ये होणाऱ्या जागतिक शांतता परिषदेसाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे टीएमसी खासदारांकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. यातच, अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, जागतिक शांतता परिषदेसाठी ममता बॅनर्जींना विशेष आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांना जाऊ देण्यात आले नाही. कारण त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवरही निशाणा साधला. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, तुम्ही यावेळी उत्तर प्रदेशची स्थिती पाहा. भाजपा सध्या तालिबानच्या शैलीत राज्य करत आहे. नागरिकांना स्वातंत्र्य नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्वकाही ठरवत आहेत.
आम्ही शिष्टाचार आणि शिस्त राखण्यासाठी परवानगी मागितली - ममता बॅनर्जीजागतिक शांतता परिषदेसाठी रोमला जाण्यासाठी परवानगी मिळाली नसल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अनेक राज्य परदेशात जाण्याची परवानगी घेत नाहीत, परंतु आम्ही शिष्टाचार आणि शिस्त राखण्यासाठी परवानगी मागितली होती. तो मला गप्प बसवू शकत नाही. यापूर्वीही मला शिकागो, केंब्रिज, चीन आणि सेंट स्टीफन्सच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यापासून रोखण्यात आले होते. याचबरोबर, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही 30 वर्षे सीपीएमशी लढलो. मी काँग्रेस सोडली होती कारण त्यांनी सीपीएम बरोबर भागीदारी केली होती, जी अजूनही चालू आहे. त्यांचा भाजपासोबत करारही आहे. आम्ही भाजपाला देशातून हद्दपार करण्याचे वचन देतो.