Mamata Banerjee On Sandeshkhali Violence: पश्चिम बंगालमधील संदेशखली येथील हिंसाचारावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी (18 फेब्रुवारी) भाष्य केले. संदेशखलीमध्ये हिंसाचार पसरवण्यात भाजप आणि डाव्या पक्ष सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजप, सीपीआयएम आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि तिघेही टीएमसीविरोधात एकत्र काम करत असल्याचेही म्हटले.
'राम-वाम-श्याम'संदेशखली हिंसाचारात तृणमूल नेते उत्तम सरदार आणि शिबू हाजरा यांच्या अटकेचा संदर्भ देत ममता म्हणाल्या की, मी पोलिसांना फ्री हँड दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर आरोप आहे, त्या नेत्यांवरही राज्य सरकार कारवाई केली करत आहे. पण, भाजपने हिंसाचार करणाऱ्या आपल्या लोकांवर कारवाई केली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी ममतांनी भाजप, काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर टीका करताना "राम-वाम-श्याम" असा त्यांचा उल्लेख केला.
'मी भाजपशीही लढणार'भाजपवर टीका करताना ममता म्हणाल्या, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जातोय. पश्चिम बंगालमधील 33 वर्षांच्या डाव्या सरकारच्या राजवटीचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, मी अनेक वर्षे डाव्या पक्षांच्या छळाचा सामना केला, आता भाजपलाही सामोरे जाईन. शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत सीएम ममता म्हणाल्या की, जे शेतकरी संपूर्ण देशासाठी अन्नधान्य निर्माण करतात, त्यांना कसे वागवले जात आहे? पंजाब, दिल्ली आणि हरियाणा जळत आहे. शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा मी निषेध करते.