कोलकाता : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजसंबंधी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, या आर्थिक पॅकेजवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आर्थिक पॅकेजने जनतेची फसवणूक केली असून ते एक मोठा शून्य (बिग झिरो) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "लोकांना आशा होती की, पंतप्रधान देशवासियांना काहीतरी देतील. मात्र, या लोकांना फसविले आहे, त्यांना काहीही मिळाले नाही."
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज लाजिरवाणे आहे. नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला हवे होते. या पॅकेजमध्ये राज्यांना काहीच मिळाले नाही. आमच्या राज्याचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी सांगितले की, 20 लाख कोटींमधील दहा कोटींच्या योजना आधीपासूनच सुरु आहेत आणि राज्यांना काहीही मिळालेले नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्र एक पालक संस्थेसारखे आहे आणि राज्य मुले आहेत. फक्त बोलणे आणि आयटी सेलची सेवा घेऊन काहीही होत नाही, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर केली आहे. त्या म्हणाल्या, "पालक मुलांचे संगोपन करतात. संघीय व्यवस्थेत केंद्र राज्यांचे पालक असतात, त्यांची जबाबदारी राज्यांची काळजी घेण्याची असते. मात्र, केंद्र फक्त भाजपाच्या सेल (आयटी सेल) ला सक्रिय करत आहे. ते खोट्या बातम्या पसरवत आहेत जेणेकरून जातीय दंगल पसरवता येईल."