नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. यानंतर आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. "मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपासमोर झुकणार नाही" असं म्हणत ममता यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
सोमवारी हुगळी येथे एका जनसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्या लोकांनी माझा अपमान केला आहे. मी बंदुकीच्या गोळीवर विश्वास ठेवत नाही तर मी राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपाने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बंगालचा अपमान केला आहे. या कार्यक्रमात जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने घोषणा दिल्या असत्या तर मी तुम्हाला सलाम केला असता. पण तुम्ही जर मला बंदुकीच्या नळीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर अशावेळी प्रतिहल्ला कसा करायचा हे मला चांगलच माहीत आहे. त्या दिवशी त्यांनी बंगालचा अपमान केला आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
"माझ्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन"
तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी माझ्यावर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर मी सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला फासावर लटकवून घेईन असंही म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारने जर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करता येईल असा काही कायदा आणला तर मी लगेच राजकारण सोडून देईन असं देखील म्हटलं आहे. रविवारी एका रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
डायमंड हार्बर मतदारसंघातून खासदार असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांनी यांनी कुलताली विधानसभा मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच कुटुंबातील एकाहून अधिक सदस्य राजकारणात येऊ शकत नाही अशा पद्धतीचा काही कायदा आणणार असतील तर पुढच्या क्षणी मी राजकीय आखाड्यातून बाहेर पडेन असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "कैलाश विजयवर्गीय यांच्यापासून शुभेन्दु अधिकारींपर्यंत आणि मुकुल रॉय यांच्यापासून ते राजनाथ सिंह यांच्यापर्यंत भाजपा नेत्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य भाजपाच्या महत्वाच्या पदांवर आहेत."