पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच माझा फोन टॅप केंद्र सरकार आणि दोन राज्य सरकारांच्या इशाऱ्यावरून होत आहे. यात एक राज्य भाजपशासित आहे. त्यामुळे सध्या जे सुरू आहे याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभिर्याने पाहायला हवे, असे आवाहन देखील ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझा फोन टॅप केला जात आहे. यामुळे मी फोनवर मोकळेपणाने बोलू शकत नाही. तसेच व्हॅाट्सअॅपवरही हीच स्थिती आहे. मी जेव्हा एखाद्याला फोन करते, त्यावेळी कोणीतरी तो ऐकत असतो. तसेच पश्चिम बंगालमधील राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्यावर नजर ठेवली जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार दिला असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावू शकत नाही. तसेच तुम्हाला जर मोकळेपणाने बोलता येत नसेल तर हे कोणत्या प्रकराचे स्वातंत्र्य आहे असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपाबाबत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट करण्यापूर्वी प्रथम आपल्या राज्यातील समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार विरोधी पक्षांवर खोटे आरोप करत आहे. राज्यात रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांची हत्या होत आहे. राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या फोन कॉल्सवर नजर ठेवण्याची यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.