पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काल राहत्या घरी गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारांसाठी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या डोक्याला चार टाके घालावे लागले आहेत. उपचारांनंतर ममता बॅनर्जी यांना घरी पाठवण्यात आले. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्रिपदी असलेल्या ममता बॅनर्जी यांना राहत्या घरी झालेल्या दुखापतीबाबत काही प्रश्न उपस्थित होत असून, त्या प्रश्नांमुळे या संपूर्ण प्रकरणाबाबतचं गुढ वाढलं आहे.
मुख्यमंत्र्यांना रहस्यमय परिस्थितीमध्ये दुखापत झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास कुरू केला आहे. पोलीस मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणाऱ्या येणाऱ्यांची यादी तयार करत आहेत. या प्रकरणी सखोल तपास झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे. मात्र तोपर्यंत काही प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक बनलं आहे. यात पाच प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहेत. ते पुढीलप्रमाणे.
१ - ही घटना घडली तेव्हा ममता बॅनर्जी एकट्या नव्हत्या. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. ते सुद्धा ममता बॅनर्जींसोबत घरात फिरत होते. ममता बॅनर्जी या पाठीमागून धक्का लागल्याने पडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा अपघात होता की हल्ला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २ - ममता बॅनर्जी यांच्यासोबत फिरत असलेली व्यक्ती चालता चालता अडखळून त्यांच्यावर पडली की, कुणी हल्लेखोर होता तो सुरक्षा व्यवस्था भेदून घरामध्ये कसा पोहोचला?३ - मुख्यमंत्री असल्याने ममता बॅनर्जी यांच्याकडे झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र ज्या प्रकारे मागून धक्का दिला गेला, असं ममता बॅनर्जींनी पोलीस आयुक्तांसमोर सांगितलं आहे, त्यामुळे सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ४ - ममता बॅनर्जी यांना दुखापत झाल्याची माहिती रुग्णालयाबरोबरच तृणमूल काँग्रेसकडून समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांचा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र त्यानंतर या घटनेबाबत कुठलीही अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. ५ - सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या घारामध्ये हल्लेखोर कसे घुसले आणि त्यांना धक्का देऊन कसे निघून गेले हा आहे. या दरम्यान, कुटुंबीयांचं सर्व लक्ष ममता बॅनर्जी यांच्यावरच होतं, असं मानलं तरी, हल्लेखोर सुरक्षा रक्षकांच्या नजरेत का आला नाही, हाही प्रश्न उपस्थित होतो.